लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार नाही-खोतकर; उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा लढणार

Foto
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटून उभे ठाकलेले पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आपण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले.

 एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन खोतकर म्हणाले, शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला असली तरी शिवसैनिकांच्या भावना वेगळ्या आहेत. ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेला युतीचा निर्णय मान्य करावा लागेल. युतीचे आम्ही स्वागत करू. मात्र, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. लोकसभेच्या जालना जागेबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही. अद्याप कोणताही निरोप मला मिळालेला नाही, त्यामुळे मी अजूनही निवडणुकीतून माघार घेतलेली नाही.

जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे. अजूनही युतीच्या जागा वाटपात कोणताही निर्णय झाला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज आहे. आजपर्यंत जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे निवडणूक लढवत आले आहेत. दानवे यांचा प्रचार शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे केला आहे. मात्र, निवडणुकीनंतरच्या काळात अनेकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. अनेक कामांसाठी रखडवण्यात येते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दानवे यांच्याविरोधात नाराजी आहे. शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन, कार्यकर्त्यांच्या व माझ्या हिताचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असा विश्‍वास खोतकर यांनी व्यक्‍त केला.
 
फडणवीस व उद्धव ठाकरेंसोबत खोतकरांची चर्चा
खा.रावसाहेब दानवे व अर्जुन खोतकर यांच्यातील संघर्ष पराकोटीला गेल्याने खोतकर यांनी दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले. खोतकर यांची समजूत काढण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जालन्यात धाव घेतली होती. यावेळी देशमुख व खा. दानवे यांनी खोतकरांच्या घरी त्यांच्याशी चर्चा करून मनधरणी केल्यानंतरही खोतकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री खोतकर यांना ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावून घेतले. आता युती झाली आहे. राग सोडा, एकत्र काम करू, असे फडणवीस यांनी त्यांना सांगितले. त्यावर आम्हीपण युतीतच होतो ना, मंत्रीही होतो. मग अन्याय का केला? जालन्यात शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास का दिला, असा सवाल खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला. बुधवारी खोतकर यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन खा. दानवे यांनी जालन्यातील शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला, खोट्या गुन्ह्यात अडकवले याचा पाढा ठाकरे यांच्यासमोर वाचला. त्यावर फडणवीस व दानवे भेटायला येणार आहेत. त्यावेळी यावर निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी खोतकर यांना सांगितल्याचे समजते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker